इथे खड्ड्यांचा धोका, एक झोका! एसटी प्रवासी लुटताहेत झोक्याचा आनंद; सफरीचा VIDEO पाहाच.
चांद्यापासून बांद्यापर्यंत खड्ड्यांची समस्या कायम आहे.चंद्रपुरातील काही एसटी प्रवाशांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एसटीचे प्रवासी खड्ड्यांमुळे झुल्याचा आनंद घेत आहेत.चंद्रपूर जिल्ह्यातील असा एक मार्ग आहे, ज्या मार्गावरून प्रवास करताना झुल्याचा किंवा झोक्याचा आनंद घेता येईल. हा आनंद एसटीचे प्रवासी मनसोक्तपणे लुटत आहेत.
या रस्त्याच्या दुर्दक्षेकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचं लक्ष नाही. त्यामुळे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी सोशल मीडियापासून एकापेक्षा एक लय भारी मीम्स व्हायरल झाले आहेत.चंद्रपूर-यवतमाळ जिल्ह्याला जोडणारा कोरपना ते वणी राज्य महामार्ग गेल्या एक दशकापासून उपेक्षित आहे. मार्गाची अवस्था अत्यंत बिकट आहे. रस्त्यावर हजारो खड्डे आहेत.
त्यामुळं जीवघेण्या खड्ड्यातून मार्ग काढताना वाहनधारकांची मोठीच दमछाक होते. राजुरा आगाराने मार्गाची अवस्था बघता या मार्गावरील बस फेऱ्या बंद केल्या होत्या. आता परत बसफेरी सुरू झाली आहे. एसटीमधून प्रवास करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. प्रवास करताना झोक्याचा आनंद घ्यायचा असल्यास या मार्गानं प्रवास करा, असा उपहासात्मक टोला प्रवासी लगावत आहे.
खड्डे आणि रस्ता हा काही नवे नाही. रस्त्यात खड्डे, खड्डेयुक्त रस्ते आपल्यासाठी नवीन नाही. किंबहुना रस्त्यात खड्डा आला नाही तर आपल्याला चुकल्या चुकल्यासारखं वाटतं. एखादा चांगला, खड्डे नसलेला रस्ता दिसला की आपल्याला फॉरेनला गेल्याचा फील येतो.