बनावट सोने : एका गरिबाला नाहक त्रास होतोय, एका टपरीवाल्याची सही -अंगठ्याचा गैरवापर करून फसवणूक
सध्या नगर शहरामध्ये बनावट सोने प्रकरण चांगलेच गाजत आहे. खोटे सोने बँकेत ठेवून कोट्यावधीरुपयांची फसवणूक बँकांची झालेली आहे. यामध्ये आता काही वेगळीच प्रकरणे समोर येत आहेत त्या बद्दल आपण सविस्तर पाहूया,
मित्र म्हंटले कि आला सगळा भोळा कारभार, जवळच्या मित्रांवरकोण अन्ही विश्वास ठेवणार ? पण एका मित्रानेच खोटे बोलून मित्राची फसवणूक केली आहे. एका टपरी चालकाला वैद्यकीय उपचारांसाठी पाच हजार रुपयांची गरज होती. त्याने ती मित्राला सांगितली. मित्राने पैसे नाही, पण सोने आहे व ते आपण तारण ठेवून कर्ज घेऊ असे सांगून कागदपत्रांवर टपरी चालकाच्या सह्या घेतल्या व तो गायब झाला.
इकडे टपरी चालक पाच हजारांची वाट पाहत राहिला व काही दिवसांनी त्याच्या नावावर बनावट सोने तारण ठेवून तब्बल 2 लाख 80 हजारांचे कर्ज ‘त्या’ मित्राने घेतल्याचे पोलिसांनी त्याला सांगितले. टपरी चालकाने डोक्याला हात लावला व आता पोलीस चौकशीचा ससेमिरा मागे लागल्याने रडकुंडीला आला आहे. नगरमध्ये उघड झालेल्या सुमारे 6 कोटींच्या बनावट सोनेतारण कर्ज प्रकरणात काहींच्या परिस्थितीचा फायदा उठवत फसवणूक केल्याचे समोर येत आहे.
शहर सहकारी बँकेत आतापर्यंत 8 हजार 933 ग्रॅम म्हणजे सुमारे नऊ किलो बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून त्यावर कोट्यवधी रुपयांचे कर्ज काढले आहे. या प्रकरणात 37 जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे व 3 कोटी 22 लाखांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच श्रीसंत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीमध्ये 8 हजार 564 ग्रॅम म्हणजे सुमारे साडेआठ किलो बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून कर्ज उचलण्यात आले आहे. या गुन्ह्यात 53 आरोपींचा समावेश असून आतापर्यंतच्या तपासणीत 2 कोटी 88 लाखांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे.