किनवटला जिल्हा करा; धनगर संघर्ष समितीच्या वतीने मुख्यमंत्री शिंदे यांना निवेदन.
किनवट तालुका प्रतिनिधी / मारोती देवकते
अतिदुर्गम, मागास व डोंगराळ म्हणून ओळख असलेल्या व नांदेडपासून दीडशे किलोमीटर अंतरावर असलेल्या किनवटला लवकरात लवकर जिल्ह्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी धनगर संघर्ष समितीच्या वतीने युवक प्रदेशाध्यक्ष अमन लक्ष्मणराव कुंडगीर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंत्रालय मुंबई येथे भेट घेवून निवेदन देवून केली आहे.
धनगर समाजाच्या प्रलंबित प्रश्नावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याची माहिती दिली. तेलंगाना, विदर्भ सिमेवर असलेला व नांदेड पासून दीडशे किलोमीटर अंतरावर असलेल्या किनवट या अतिदुर्गम मागास व डोंगराळ तालुक्याचा जिल्हा निर्मितीचा प्रश्न मागील तीस वषार्पासून प्रलंबित आहे, यासाठी या भागातील विविध पक्षामार्फत तसेच सामाजीक संघटनेमार्फत पाठपुरावा केला जात आहे.
किनवट तालुका पत्रकार संघटनेने तर जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी अनेकदा लक्षवेधी आंदोलने केली मात्र शासन याची दखल घेण्यास तयार नाही. जिल्हा निर्मितीच्या निकषांमध्ये किनवट तालुका पूर्णपणे पात्र असतानाही या तालुक्याला जिल्ह्याचा दर्जा देण्यास टाळाटाळ केली जात आहे. जिल्हा निर्मितीचा प्रश्न हा विकासात्मक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असल्यामुळे धनगर संघर्ष समितीचे युवक प्रदेशाध्यक्ष अमन लक्ष्मणराव कुंडगीर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 27 सप्टेंबर रोजी मुंबई येथे मंत्रालयात भेट घेतली व त्यांना संघषं समीतीच्या वतीने किनवट जिल्हा निर्मिती करण्याबाबतचे निवेदन सादर केले आहे.
किनवट तालुक्याची लोकसंख्या, भौगोलिक क्षेत्रफळ त्याचबरोबर शासकीय, निमशासकीय कार्यालयांची संख्या लक्षात घेता तसेच गोरगरीब नागरिकांना शासकीय कामे अथवा दवाखान्यासाठी दीडशे किलोमीटर अंतर कापून जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते. ही गैरसोय टाळण्यासाठी लवकरात लवकर किनवट जिल्हा निर्मितीचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी कुंडगीर यांनी निवेदनातून केली आहे. यावेळी त्यांनी धनगर समाजाच्या विविध समस्यांवर मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. या प्रसंगी माजी खासदार पद्यश्री डॉ. विकासजी महात्मे यांच्यासह घनगर समाज संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.