खा. निलेश लंके यांनी आपत्तीग्रस्त भागाची पाहणी करून लोकांना दिलासा दिला, मा मंत्री तनपुरे हे त्यांच्यासमवेत होते.

पंचनाम्या अगोदर तात्काळ मदत द्या : खा. निलेश लंके यांची मागणी.
अहिल्यानगर : प्रतिनिधी – लोकांनी आयुष्यभर कष्टाने उभे केलेले संसार एका रात्रीत उध्वस्त झाले आहेत. पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू असली तरी लोकांना तातडीने मदतीची गरज आहे. “कागदी अहवाल तयार होईपर्यंत लोक उपाशी राहणार का?” असा सवाल उपस्थित करून शासनाने तात्काळ आर्थिक व साहित्य मदत करावी, अशी ठाम मागणी खासदार नीलेश लंके यांनी केली.
तिसगाव परिसरात दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला, रस्ते वाहून गेले, घरे पाण्यात विसावली आणि शेतजमिनीवरील पिके संपूर्णपणे नष्ट झाली. या आपत्तीग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी खासदार लंके यांनी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह मंगळवारी सकाळीच धाव घेतली. त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधत नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली.
खा. लंके म्हणाले, “नुकसानीचे पंचनामे होणे महत्त्वाचे आहे. पण पंचनामे होईपर्यंत आपत्तीग्रस्तांना उपाशी ठेवणे अमानवी आहे. पंचनामे होणारच, मात्र बाधितांना तात्काळ आर्थिक व जीवनावश्यक वस्तूंची मदत प्रशासनाने द्यावी, हीच आमची मागणी आहे.” या प्रसंगी खासदार लंके यांनी आपत्तीग्रस्तांना किराणा किटचे वाटप करून दिलासा दिला.
दरम्यान, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी एनडीआरएफच्या निकषांनुसार मिळणारी मदत अपुरी ठरते, असे सांगत शासनाने निकष बाजूला ठेवून विशेष आर्थिक पॅकेज द्यावे, अशी मागणी केली. त्यांनी सांगितले की, “इतक्या मोठ्या प्रमाणावर या भागात कधीच अतिवृष्टी झाली नव्हती. घरे, रस्ते, पिके सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे. फक्त पिकविमा किंवा सापेक्ष मदत अपुरी आहे. तसेच नद्यांच्या पात्रातील अतिक्रमणामुळे पूरस्थिती अधिक गंभीर बनते. त्यामुळे अतिक्रमणे हटविणेही गरजेचे आहे.”
दरम्यान, तिसगाव परिसरातील कोठ भागात बुखरा सिकंदर शेख या महिलेला तुटलेल्या वीजतारेचा धक्का बसून ती गंभीर जखमी झाली. त्यावेळी खा. लंके व प्राजक्त तनपुरे हे आपत्तीग्रस्तांच्या गाठीभेटी घेत होते. ही माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत स्वतःच्या वाहनातून शेख यांना रूग्णालयात दाखल केले.