पाऊस घेणार काढता पाय; परतीच्या प्रवासाला लवकरच सुरुवात.
विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी
तब्बल साडेतीन महिन्यांपासून मुंबईसह राज्य आणि देशभरात धो धो कोसळणारा पाऊस आता तीन दिवसांनी देशाच्या वायव्य भागातून आपला परतीचा प्रवास सुरू करणार आहे. नैऋत्य मान्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होणार असून, त्यानंतर राजस्थानमधून सुरू होणारा परतीच्या पावसाचा प्रवास उत्तरेकडील राज्यातून महाराष्ट्रात दाखल होणार आहे. तत्पूर्वी मुंबईसह राज्यभरात पावसाचा तडाखा सुरूच राहणार असून, मुंबईच्या तुलनेत राज्यभरात उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडला आहे. सोमवारी मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात विजांचा कडकडाट होईल. मंगळवारसह बुधवारी मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात विजांचा कडकडाट होईल. विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भात उर्वरित प्रदेशांच्या तुलनेत पावसाचा जोर तुलनेने अधिक राहील.
पश्चिम राजस्थान, पंजाब, हरयाणा, दिल्ली, चंदीगड, सौराष्ट्रातील कच्छचे रण या भागात बदललेल्या वातावरणामुळे जमिनीलगत तयार झालेल्या उच्च दाब व त्यातून घड्याळ काट्याच्या दिशेने वाहणाऱ्या प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे पाऊस परतण्यासाठीची अनुकूल स्थिती तयार झाली आहे. २१ सप्टेंबरपर्यंत केव्हाही या भागातून मान्सून परतण्यास सुरुवात होऊ शकते. कोकणवगळता महाराष्ट्रात २२ सप्टेंबरपासून पुन्हा मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता जाणवते.
- माणिकराव खुळे, माजी अधिकारी, हवामान विभाग