वीज अंगावर पडल्याने दोन महिलासह दोन बैलांचा मृत्यू
आष्टी ता.१९ (बातमीदार)- तालुक्यात शनिवारी (ता.१५) दौलावडगाव गटातील १८ गावात गारपीट होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याचे पंचनामे पूर्ण होत नाहीत तोच बुधवारी (ता.१९) पुन्हा तालुक्यात सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास सर्वदूर विजांच्या कडकडासह वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात होऊन यामध्ये काजल विकास माळी (वय २३) रा.केरुळ येथे व ताई संदीपान सावंत (रा.सांगवी आष्टी) या हिंगणी येथे वडिलांना भेटण्यासाठी गेल्या असताना अंगावर वीज पडुन या दोन्ही महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
तर पारगाव (जो.) येथील संतोष बोराडे यांच्या बैलजोडीवर वीज पडल्याने दोन्ही बैलांचा मृत्यु झाला आहे. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील दोन दिवस पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून नागरिकांनी स्वतः ची काळजी घ्यावी असे आवाहन तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी केले आहे.
आष्टी तालुक्यात दिवसेंदिवस वादळी वाऱ्यासह वीजा पडण्याच्या घटना घडत आहेत. शनिवारी तालुक्यातील १८ गावात गारपीट झाली होती. तर बुधवारी (ता.१९) पुन्हा तालुक्यातील केरूळ, हिंगणी व पारगाव जोगेश्वरी येथे सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसास सुरूवात होऊन वरील तिन्ही ठिकाणी वीज पडून यामध्ये केरूळ येथे काजल माळी, हिंगणी येथे ताई सावंत या दोन महिला मृत्यमुखी पडल्या तर पारगाव येथे दोन बैल मृत झाले.
हवामान विभागाने पुढील दोन दिवस पाऊसाचा अंदाज वर्तविला असून नागरिकांनी स्वतः ची काळजी घ्यावी असे आवाहन तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी केले आहे.