उद्यानाच्या निधीशी तुमचा काय सबंध ? नगरसेविका डॉ. विद्या कावरे यांची आमदार दातेंवर सडकून टीका.

पारनेर : प्रतिनिधी,
पारनेर नगरपंचायतला राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत नमो उद्यानासाठी १ कोटी रू. निधी नुकताच मंजूर झाला आहे.या निधीच्या श्रेयवादातून पारनेरमध्ये चांगलाच राजकीय कलगीतुरा रंगला आहे. राज्यातील सर्व नगरपंचायतींना दरवर्षी नाविन्यपूर्ण योजनेतून निधी मिळतो, जो स्थानिक विकासकामांसाठी वापरला जातो. परंतू या निधीचे श्रेय आ काशिनाथ दाते हे घेत असून त्यास नगरसेविका डॉ. विद्या कावरे यांनी आक्षेप घेत आमदार साहेब हे बरं नव्हं असा टोला लगावला आहे.
या कामाचे श्रेय आमदारांनी घेणे चुकीचे आहे. पारनेर नगरपंचायतीने मागील महिन्यात विकासकामांसाठी आमदारांना राजकीय विरोध न ठेवता सहकार्य केले आहे. आता केवळ प्रसिध्दीसाठी कामाचे श्रेय घेण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न होत आहे. आमची ही अपेक्षा आहे की, पाणी योजना डीपीआरसारख्या महत्वाच्या योजनांना मार्गी लावण्यासाठी आमदार दाते यांनी सहकार्य करावे.
एकीकडे आमदार दाते हे दरवर्षी प्रमाणे प्राप्त होणाऱ्या या निधीचे श्रेय घेण्याचा केविलवाना प्रयत्न करत असताना दुसरीकडे तत्कालीन आमदार नीलेश लंके यांनी बगिचासाठी नगरविकास खात्याकडून आणलेल्या पाच कोटींच्या निधीला कोणी आडकाठी आणली ? राज्यातील सर्व नगरपंचायतींच्या पाणी योजना मंजूर होत असताना पारनेरची पाणी योजना अडविण्याचे पाप कोणी केले ? तालुक्यातील विविध मंजूर विकास कामांमध्ये कोणी खो घातला ? मंजूर विकास कामांना स्थगिती देण्यासाठी मंत्र्यांना लेखी पत्र देणारे महाराष्ट्रातील एकमेव आमदार कोण ? तुम्ही आमदार नसताना वर्षभरापूर्वी मंजूर बस स्थानकाच्या कामामध्ये कोणी खोडा घातला ? सुरू असलेले काम कोणी बंद पाडले ? ज्या कामात आपले योगदानच नाही त्याचे भूमिपुजन करण्याचा अट्टहास कशासाठी अशा प्रश्नांची सरबत्ती करत डॉ. कावरे यांनी आ. दाते यांना चांगलेच धारेवर धरले आहे.
खा. लंकेंच्या नेतृत्वाखाली कोट्यावधींची कामे : खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह ११ नगरसेवक पारनेर नगरपंचायतमध्ये काम करतात. खासदारांच्या पाठपुराव्यामुळे नगरपंचायतला १०० ते १५० कोटी रूपयांचा निधी वेळोवेळी मिळाला आहे. या निधीतून विविध विकास कामे पूर्ण झाली आहेत. ज्यात सेनापती बापट स्मारक, प्रभु श्रीराम मंदिर सभागृह, खंडोबा मंदिर रस्ता, मार्केट यार्ड रस्ता, वरखेड माता मंदिर रस्ता, सिध्देश्वर मंदिर केटीवेअर, ग्रामदैवत नागेश्वर मंदिर सभागृह, नृसिंह मंदिर सभागृह, विविध प्रभागांत १० किलोमिटर काँक्रीट रस्ते, ग्रामदैवत भैरवनाथांचा प्रशस्त गाडू मार्ग यांचा समावेश असल्याचे डॉ.कावरे यांनी म्हटले आहे.