सावेडी येथील फिजिक्सवाला विद्यापीठ यांच्या ऑफलाइन सेंटरचा शुभारंभ.
अहमदनगर (प्रतिनिधी)- अध्यात्म आणि फिजिक्स एकमेकांशी जोडलेले आहे. विश्वाची संकल्पना फिजिक्स शिवाय अपूर्ण आहे. अध्यात्माने परिपूर्ण असलेल्या आपल्या देशाने फिजिक्स मध्ये सर्वोच्च शिखर गाठले आहे. देशातील कानाकोपऱ्यात खऱ्या गरजवंतांना ज्ञान पोहोचवण्याचे कार्य फिजिक्सवाला विद्यापीठ करत असल्याचे प्रतिपादन मुंबईचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश यांनी केले.
शहरातील सावेडी, गुलमोहर रोड येथे दिल्ली येथील फिजिक्सवाला विद्यापीठ यांच्या ऑफलाइन सेंटरच्या शुभारंभ रविवारी (दि.7 जानेवारी) प्रसंगी कृष्ण प्रकाश बोलत होते. सावेडी येथील माऊली संकुल सभागृहात आमदार संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्घाटन कार्यक्रमासाठी फिजिक्सवाला विद्यापीठाचे फॅकल्टी स्टार क्षितीज कणिक, तरुण खंडेलवाल, नितीनकुमार बिट्टल, नकुल तिजारे, साहित्यिक देवेंद्रसिंह वधवा, सामाजिक कार्यकर्ते हरजितसिंह वधवा, संचालक हरीश तावरे, जस्मितसिंह वधवा, महेश काळे, सहेजकौर वधवा, दिपाली काळे, युगंधरा तावरे, मुकुंद गंधे, राजेश जग्गी, सनी वधवा, रमेश तावरे, नगर शाखेचे नेहा तलवार, सुवर्णा रिंगणे, सुमित वैराळ, मिसबा शेख आदींसह जिल्हाभरातून आलेले विद्यार्थी, युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे कृष्ण प्रकाश म्हणाले की, गुरु शिष्यांना पूर्ण क्षमतेने ज्ञान देत असले तरी विद्यार्थ्यांना परिश्रमाने व मनापासून ते ग्रहण करावे लागणार आहे. शिक्षणाला शॉर्टकट नाही. शिक्षणासाठी बुद्धी व परिश्रम गरज असून, स्पर्धा देखील मोठी आहे. ज्याच्यात क्षमता असेल तो या स्पर्धेत टिकणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर शिक्षणात मित्रांशी स्पर्धा न करता, त्यांच्याबरोबर एकजुटीने शक्ती निर्माण करुन पुढे जाण्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, शिक्षण क्षेत्राततून प्रत्येकाच्या जीवनाचा पाया रचला जातो. विद्यार्थ्यांचा पाया भक्कम करण्याची आवश्यकता असून, शहरात नव्याने आलेले हे शैक्षणिक संकुल दिशादर्शक ठरणार आहे. शिक्षणातून समृद्ध व आत्मनिर्भर भारताचे पाऊल पडत आहे. पिढी घडविण्याचे कार्य फिजिक्सवाला विद्यापीठ करत आहे. 2023 हे वर्ष चंद्रयान वर्ष म्हणून ओळखले जाणार असून, हा दिवस देखील दरवर्षी साजरा होणार आहे. अध्यात्मातून जीवनात ऊर्जा निर्माण होत असते व ही प्रक्रिया फिजिक्सची जोडलेली असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी सरस्वती पूजन करुन दीपप्रज्वलनाने उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते फिजिक्सवाला विद्यापीठ यांच्या ऑफलाइन सेंटरचा शुभारंभ करण्यात आला. फॅकल्टी स्टारयांनी एखादी गोष्ट मनाला लागली तर जीवनात बदल घडतो. जीवनात ध्येय प्राप्ती करण्यासाठी मनातील नकारात्मकता सोडा. स्पर्धा परीक्षेतून यश संपादन करणारे आपल्यातीलच एक असतात. सातत्याने परिश्रम करा यश निश्चित मिळणार असल्याचा त्यांनी विद्यार्थ्यांना संदेश दिला. तर स्वतःला कमी समजू नका, सर्व काही शक्य असल्याचा आत्मविश्वास विद्यार्थ्यांना देऊन विद्यार्थी दशेतील वेळ वाया न घालवता वेळेचे नियोजन करण्याचे त्यांनी सांगितले. तर उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधून अभ्यासातील येणाऱ्या अडीअडचणी संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांचे प्रश्न विचारुन अचूक उत्तरे देणाऱ्यांना बक्षीसं देखील देण्यात आले. कार्यक्रमास उपस्थित असलेले कृष्ण प्रकाश व विद्यापीठाचे फॅकल्टी स्टार यांच्यासह सेल्फी घेण्यासाठी विद्यार्थ्यांसह युवक-युवतींनी झुंबड उडाली होती.
फिजिक्सवाला विद्यापीठ यांचे देशात 86 ठिकाणी जेईई मेन्स, जेईई ॲडव्हान्स, एनईईटी (नीट), एमएचसीईटी स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणारे केंद्र आहेत. त्याची शाखा नगरला सुरू झाली असून, शहरातील विद्यार्थ्यांना इतर मोठ्या शहरात जाण्याची गरज भासणार नाही. तर इयत्ता आठवी ते बारावी मधील विद्यार्थ्यांना भविष्यातील ध्येय समोर ठेऊन सायन्सचे क्लास घेऊन तयारी करुन घेतली जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करुन दिप्ती शुक्रे यांनी आभार मानले.