खा. निलेश लंके यांचा ठेकेदार व अधिकाऱ्यांवर संताप – भरपाईची मागणी.

नगर-कल्याण रोडवरील सीना नदीवरील पुलाचे अर्धवट व चुकीचे काम हे नागरिकांसाठी संकट ठरले आहे. पुलाच्या मोठ्या भिंतीमुळे पावसाचे पाणी निचरा न होता वसाहती व शेतात घुसले असून, घरांचे व पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
या गंभीर प्रकाराची जबाबदारी ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर निश्चित करीत झालेल्या नुकसानीची भरपाई वसूल करण्याची मागणी खासदार निलेश लंके यांनी केली आहे. सोमवारी त्यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी करत अधिकाऱ्यांना व ठेकेदार प्रतिनिधींना धारेवर धरले.
पाहणीवेळी माजी महापौर अभिषेक कळमकर, माजी नगरसेवक योगीराज गाडे, तसेच अन्य स्थानिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. खा. लंके यांनी काम योग्य पद्धतीने करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
सीना नदी पुलाचे काम सुरू होऊन २१ महिने उलटले तरी अद्याप पूर्ण झालेले नाही. कामाची मुदत संपली असून जुना पूल धोकादायक स्थितीत आहे. नव्या पुलाच्या कामातील दिरंगाईमुळे वाहतूक कोंडी, रूग्णवाहिका व शालेय बसेस यांना अडथळा निर्माण होत आहे.
सततच्या पावसामुळे जुन्या पुलावर पाणी साचून अपघाताचा धोका वाढला आहे. या परिस्थितीवर तोडगा न काढल्यास हा विषय संसदेत उपस्थित करून उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली जाईल, असा इशारा खा. लंके यांनी दिला आहे.