आपला मावळा संघटनेच्या दिनदर्शिकेचे खासदार डॉ. निलेश लंके यांच्या हस्ते भव्य प्रकाशन.

लोकप्रिय खासदार डॉ. निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली गडकिल्ल्यांच्या स्वच्छता, संवर्धन आणि जतनासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या आपला मावळा संघटनेने नववर्षाच्या निमित्ताने विशेष दिनदर्शिका तयार केली असून, या दिनदर्शिकेचे प्रकाशन खासदार डॉ. निलेश लंके यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडले. छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास, त्यांचे विचार, शौर्य आणि गड-किल्ल्यांचे महत्त्व समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावे, तसेच नव्या पिढीत गडसंवर्धनाची जाणीव अधिक दृढ व्हावी, या उदात्त हेतूने ही दिनदर्शिका तयार करण्यात आली आहे.
आपला मावळा संघटनेने सन 2025 या संपूर्ण वर्षभरात शिवनेरी, धर्मवीरगड, रायरेश्वर, रामशेज, विश्रामगड, तिकोना, प्रतापगड, भुदरगड, सिंहगड आणि साल्हेर या ऐतिहासिक किल्ल्यांवर स्वच्छता व संवर्धन मोहिमा यशस्वीपणे राबवल्या. या प्रत्येक मोहिमेला तरुणाईपासून आबालवृद्ध, महिलांपर्यंत सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या गडकोट संवर्धन मोहिमेमध्ये महाराष्ट्रातील विविध मान्यवर नेते, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते तसेच इतिहासप्रेमींनी सक्रिय सहभाग घेतला. विशेष म्हणजे, येत्या मार्च महिन्यात रायगडावर होणाऱ्या मोहिमेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रायगडाला भेट देण्याचे आश्वासन खासदार डॉ. निलेश लंके यांना दिल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा नागरिकांच्या मनात कायम जिवंत राहावा, तसेच गडकोट संवर्धन चळवळ अधिक व्यापक व्हावी, या उद्देशाने आपला मावळा संघटनेने तयार केलेल्या या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमास सर्वसामान्य नागरिक, जेष्ठ नागरिक, आपला मावळा संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते संख्येने उपस्थित होते. गड-किल्ले संवर्धनासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून मावळे एकत्र येत असल्याचे हे जिवंत उदाहरण ठरले.
या दिनदर्शिकेच्या माध्यमातून आपला मावळा संघटनेचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रात अधिक प्रभावीपणे पोहोचेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर, संस्कारांवर चालण्यासाठी अधिकाधिक नागरिक प्रेरित होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.



