ब्रेकिंग : विजय औटीसह तिघांचे जामीन फेटाळले, नगरच्या सत्र न्यायालयाचा निर्णय कोठडीतील मुक्काम वाढला.
नगर : प्रतिनिधी,
खासदार नीलेश लंके यांचे सहकारी अॅड. राहुल झावरे यांच्यावर ६ जुन रोजी केलेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत असलेला पारनेरचा माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक विजय सदाशिव औटी याच्यासह प्रितेश पानमंद व मंगेेश कावरे यांचे जामीन अर्ज नगरच्या सत्र न्यायालयाने बुधवारी फेटाळले. दरम्यान न्यायालयाच्या निर्णयामुळे विजय औटीसह इतरांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
दि.६ जुन रोजी अॅड. राहुल झावरे व इतरांची किरकोळ बाचाबाची झाली होती. त्या कारणावरून मा. नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी, त्याचा भाउ माजी नगरसेवक नंदू औटी, प्रितेश पानमंद, मंगेश कावरे, अंकुश भागाजी ठुबे, नीलेश उर्फ धनू दिनकर घुमटकर, संगम सोनवणे, नामदेव लक्ष्मण औटी, पवन बाबा औटी, प्रमोद जगन्नाथ रोहोकले, प्रथमेश दत्तात्रय रोहोकले, सुरेश अशोक औटी यांनी पारनेर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात प्राणघातक हल्ला केला होता. या प्रकरणी पारनेर पोलीसांनी विजय औटी, नंदू औटी, प्रितेश पानमंद व मंगेश कावरे यांना त्याच दिवशी अटक केली होती. पुढे न्यायालयाने त्यांना अनुक्रमे पाच व तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली होती.
चारही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर त्यांनी नगरच्या सत्र न्ययालयात जामीनासाठी अर्ज दाखल केले होते. या अर्जावर मंगळवारी युक्तीवाद होऊन न्यायालयाने विजय औैटी, प्रितेश पानमंद व मंगेश कावरे यांचे जामीन अर्ज फेटाळून लावले. न्यायालयीन कोठडीतील नंदू औटी याचा जामीन अर्ज सादर करण्यात आला नव्हता. दरम्यान, जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याने विजय औटीसह इतरांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे.
ॲड मंगेश दिवाणे ( सरकारी वकिल ) ॲड अभिषेक भगत, ॲड अरुण बनकर, ॲड गणेश कावरे, ॲड स्नेहा झावरे, ॲड ऋषिकेश राऊत, ॲड.शुभम राजूरकर यांनी काम पाहिले.