दलाल राहुल शिंदे यांचे संतुलन बिघडले ! सुवर्णा धाडगे यांची बोचरी टीका एखाद्या निवडणूकीत गुलाल घेतला का ?
पारनेर : प्रतिनिधी ,
पारनेर तालुक्यातून नीलेश लंके यांना मोठया प्रमाणावर पाठबळ असून इतर विधानसभा मतदारसंघातही लंके यांचाच बोलबाला आहे. संपूर्ण लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांना जनतेचा प्रतिसाद मिळत नसल्याने हतबल झालेले भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदेे यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. एकाही निवडणूकीत गुलाल न घेतलेले राहुल शिंदे हे मतदारसंघातील नागरीकांची दिशाभूल करीत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा सुवर्णा धाडगे यांनी सांगितले.
धाडगे यांनी सांगितले की, ज्या राहुल शिंदे यांना नीलेश लंके यांनी चार वेळा पराभूत केले ते लंकेे यांच्यावर पारनेर तालुका नाराज असल्याचे सांगत आहेत हाच विनोद आहे. पारनेर तालुक्याच्या कोणत्याही प्रश्नांची सोडवणूक लंके यांनी केली नसल्याचे सांगणार्या शिंदे यांना गेल्या साडेचार वर्षात त्यांनी मतदारसंघात आणलेला १ हजार ४०० कोटी रूपयांचा निधी दिसत नाही. दहशत नेमके कोण निर्माण करीत आहे ? असा सवाल करून धाडगे म्हणाल्या, नीलेश लंके यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांच्यावर केवळ कांदा भावाच्या आंदोलनाचा एकच गुन्हा दाखल आहे. केवळ स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी शिंदे हे बेछूट आरोप करीत आहेत.
नीलेश लंके यांनी प्रशासनास वेठीस धरल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे. प्रशासनास कोण वेळीस धरते हे पारनेर तालुक्यालाचा नव्हे तर संपूर्ण नगर जिल्हयास माहीती आहे. आजही पारनेर तालुक्यात लंके यांनी मंजुर करून आणलेल्या ३५० कोटींच्या कामांना विखे पिता पुत्रांनी स्थगिती देऊन सत्तेचा गैरवापर केला याचीही जनतेला जाणीव आहे.
जमीनीच्या खरेदी विक्रीमध्ये दलाली करणाऱ्या राहुल शिंदे यांनी अनेक महिलांची फसवणूक केली आहे. त्यांचे संपूर्ण आयुष्य एजंटगिरी करण्यात गेले असून त्यांनी आणखी कशात एजंटगिरी केली हे सांगण्यासाठी तोंड उघडायला लावू नका असा इशाराही धाडगे यांनी दिला आहे.
खा. डॉ. सुजय विखे यांच्या आजोबांनी तेलबिया प्रकल्प सुरू करून तरूणांना रोजगार देतो असे सांगितले होते. त्यासाठी रांजणगांव मशिद येथे शेतकऱ्यांकडून १०० एकर जमीन घेण्यात आली. आता नातू मते मागत असतानाही हा प्रकल्प का उभा राहू शकला नाही याचे उत्तरही शिंदे यांनी द्यावे असे आव्हान धाडगे यांनी दिले आहे.