पीएचडी विद्यार्थ्यांच्या फेलोशिपसाठीचा लढा सहाव्या दिवशीही सुरू; खा. निलेश लंके यांनी दिला ठाम पाठिंबा.

पुणे प्रतिनिधी :
पुण्यातील गुडलक चौक, कलाकार कट्टा येथे पीएचडी विद्यार्थ्यांचे फेलोशिपसाठीचे आंदोलन शनिवारी सहाव्या दिवशीही सुरू राहिले. पावसात भिजत, रात्रंदिवस रस्त्यावर ठाण मांडून बसलेले संशोधक विद्यार्थी शासनाच्या उदासीनतेविरोधात घोषणाबाजी करत आपला हक्क मिळविण्यासाठी संघर्ष करत आहेत.
आंदोलनात मुलींचाही उत्स्फूर्त सहभाग असून, त्या रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर ठामपणे बसून आहेत. विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले की, “आम्ही भीक मागत नाही, तर संशोधनासाठी आवश्यक असणारी फेलोशिप मागतो आहोत. शासनाने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास संशोधन थांबेल आणि त्याचा परिणाम कृषी, विज्ञान तसेच समाजाच्या भविष्यात गंभीरपणे होईल.”
विद्यार्थ्यांच्या मागण्यांमध्ये प्रमुखतः २०२३–२४ आणि २०२४–२५ या शैक्षणिक वर्षांतील पीएचडी विद्यार्थ्यांना तातडीने फेलोशिप पात्र ठरविणे, नोंदणीपासून कालावधी मोजून फेलोशिप लागू करणे, थकीत व प्रलंबित फेलोशिप तातडीने वितरित करणे आणि अधिछात्रवृत्तीच्या जाहिराती प्रसिद्ध करून सर्वांना लाभ मिळवून देणे यांचा समावेश आहे.
शनिवारी रात्री खासदार निलेश लंके यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या आणि त्यांच्या लढ्याला पाठिंबा दर्शविला. “संशोधन हे देशाच्या प्रगतीचे मूळ आहे. हे विद्यार्थी आपल्या उज्ज्वल भविष्याकरिता नव्हे तर शेतकरी आणि समाजाच्या विकासासाठी झगडत आहेत. त्यामुळे शासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घेतला पाहिजे,” असे लंके यांनी सांगितले.
लंकेंनी पुढे इशारा दिला की, सरकारने उदासीनता सोडून ठोस निर्णय न घेतल्यास तरुणांचा आक्रोश आणखी प्रखर होईल. संशोधनाला दडपून टाकण्याचा प्रयत्न म्हणजे समाजाच्या प्रगतीवर पाणी फेरण्यासारखे आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला विविध संघटनांचा व स्थानिक नागरिकांचा पाठिंबा मिळत आहे. अनेक समाजघटक आंदोलनस्थळी भेट देऊन संशोधक विद्यार्थ्यांना मानसिक व नैतिक आधार देत आहेत. पुण्यातील या आंदोलनामुळे राज्यातील इतर विद्यापीठातील संशोधकांमध्येही असंतोष वाढत असल्याचे दिसून येत असून, लवकरच या आंदोलनाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.