वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत जल जीवनच्या कामांची तपासणी करा खा. निलेश लंके यांच्या सुचना…
जिल्हा विकास समन्वयक व संनियंत्रण समितीची बैठक.
अहिल्यानगर : प्रतिनिधी,
जल जीवन योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या पाणी योजनांच्या कामांची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याच्या सुचना खासदार नीलेश लंके यांनी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांना दिल्या. जल जीवन मिशन योजनेअंगतर्गत जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या पाणी योजनांबाबत अनेक तक्रारी असून खा. लंके यांनी या कामांच्या चौकशीच्या सुचना दिल्याने ठेकेदारांमध्ये खळबळ उडाली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची अध्यक्ष खासदार भाऊसाहेब वाकचौरे व सहअध्यक्ष नीलेश लंके यांच्यासह अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अशिष येरेकर, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक राहुल शेळके यांच्यासह अधिकारी यावेळी उपस्थ्ति होते.
यावेळी बोलताना लंके म्हणाले, मंजुर घरकुलांसाठी लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून द्यावी, पीक विमा योजनेची रक्कम बँकेच्या खात्यावर परस्पर वर्ग करू नये. प्रधानमंत्री खनिज क्षेत्र योजनेत चांगली कामे करता येतील असेही खा. लंके यावेळी म्हणाले.
खा. वाकचौरे म्हणाले, लोकप्रतिनिधी आणि अधिका-यांमध्ये सुसंवाद ठेऊन केंद्र पुरस्कृत योजनांचा अधिकाधिक लाभ मिळवून देण्यावर भर देण्यात यावा. अधिकाऱ्यांना योजनांच्या अंमलबजावणीत अडचण येत असल्यास केंद्र सरकारला त्याबाबत अवगत करता येईल. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीत येणा-या अडचणी लक्षात घेता आवष्यक बदलाबाबत प्रस्ताव तयार करावा. ग्रामपंचायत आणि कृषि विभागाने अपुर्ण कामे पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा अधिकाधिक लाभार्थ्यांना लाभ द्यावा, स्वच्छतागृह नसलेल्या शाळांचे प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना खा. वाकचौरे यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, घरकुलांच्या ६ हजार ३०५ लाभार्थ्यांना प्रशासनाने जागा उपलब्ध करून दिली आहे. उर्वरित ३९८ लाभार्थ्यांनाही लवकरच जागा उपलब्ध करून दिली जाईल. अध्यक्षांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे यत्रणांनी कामे करावीत.