अवैध धंद्याच्या माध्यमातून संघटीत गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करा, श्रीगोंदा कडकडीत बंद.
श्रीगोंदा प्रतिनिधी:- श्रीगोंदा शहरातील वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे आणि दोन दिवसांपूर्वी विद्यार्थ्यामध्ये दुचाकीवरून कट मारण्याच्या प्रकरणावरून पोलीस स्टेशनच्यासमोर दोन गटात झालेली मारहाणीची घटना या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न करत श्रीगोंदा शहरातून मुक मोर्चा काढत तहसिल कार्यालयाच्या आवारात सर्व पक्षीय निषेध सभा घेण्यात आली. या निषेध सभेत सर्वांनी श्रीगोंदा शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्याना पोलिसांचा वरदहस्त असल्याचा आरोप करत पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली.
नागरिकांनी या मोर्च्याला उस्फुर्तपणे प्रतिसाद देत शुक्रवारी दिवसभर शहरबंद करत या घटनेचा निषेध केला. यावेळी माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते म्हणाले की, गेल्या पंचेचाळीस वर्षापासून मी समाजासाठी वाहून घेतले आहे. श्रीगोंदा तालुका हे माझे कुटुंब आहे. तालुक्याच्या विकासासाठी आजपर्यंत भरभरून दिले आहे यापुढेही देत राहील. मात्र त्याच बरोबर सामाजिक सलोखाही तितकाच महत्वाचा आहे. आरोपींना अटक न करता पोलीस अधिकारी आम्हाला मोर्चा काढू नका असे म्हणत असेल तर आता आरोपींची अडचण नाही त्यांच्यावर कारवाई होईलच मात्र आचारसंहिता संपताच पोलीस निरीक्षक ढिकले हे श्रीगोंदा पोलीस स्टेशनला कार्यरत नसतील.
तेवढी तजवीज मी करून ठेवली आहे. त्यामुळे जाताना काहीतरी चांगल काम करून जा नाहीतर श्रीगोंद्याचे बदनाम पोलीस निरीक्षक म्हणून तुमची ओळख तयार होईल. त्यामुळे येत्या आठ दिवसांत जर कारवाई झाली नाही तर मात्र यापुढे कोणतेही आंदोलन होणार नाही. श्रीगोंद्याची जनता निर्णय घेण्यास सक्षम आहे. तसेच मला डॉक्टरांनी जास्त बोलू नका असे सांगितले त्यावेळी मी त्यांना म्हणालो सिंह जरी म्हातारा झाला तरी तो गवत खात नाही तो शिकारच करतो. त्यामुळे माझ्या आरोग्याची काळजी तुम्ही करू नका मी समर्थ आहे असे आमदार पाचपुते म्हणाले.
यावेळी माजी आमदार राहुल जगताप म्हणाले की, अवैध व्यवसायाच्या माध्यमातून गुन्हेगारी पोसली जात असल्यामुळेच किरकोळ वादातून मारहाणीची प्रकरणे वाढत असून छोट्या मोठ्या गुन्ह्यांना पोलिसांकडून पाठबळ मिळाल्यामुळेच शहरांमध्ये अराजकता माजली आहे. शहरामध्ये कॉफी बारच्या नावाखाली अश्लील चाळे चालत असून पोलिसांचे त्याच्याकडेही दुर्लक्ष आहे. प्रशासनाने आठ दिवसाच्या त्यांचा बंदोबस्त न केल्यास दहशत वाजवणाऱ्या गुंडांच्या विरोधात धडक भूमिका घेऊन त्यांचा बंदोबस्त करू असा इशारा माजी आमदार राहुल जगताप यांनी दिला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनशाम शेलार म्हणाले की, एकवीस वर्षांपूर्वी या शहरातली गुन्हेगारी संपवण्यासाठी जी भूमिका घेतली होती ती परत इतक्या लवकर घ्यावी लागेल असे वाटले नाही. पोलिसांचे दोन नंबरच्या व्यवसायाशी संबंध निर्माण झाल्यामुळे अशी वेळ पुन्हा आली आहे. त्यामुळे ज्या पोलिसांचा दोन नंबरची संबंध आहे त्यांच्यावरती तातडीने कारवाई झाली पाहिजे त्यासाठी पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असल्याचे शेलार यांनी यावेळी बोलताना सांगितले. माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे म्हणाले की, झालेली घटना गंभीर असून शहरात दहशत माजवून सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न कोणी करत असेल आणि पोलीस प्रशासन कारवाई करत नसेल तर त्याचा बंदोबस्त करायला आम्हाला लावू नका.
यावेळी बोलताना संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस म्हणाले की, पोलीस स्टेशनसमोर घडलेली मारहाणीची घटना निषेधार्ह असताना पिडीत गुन्हे दाखल करायला गेल्यावर त्यांच्यावरच गुन्हे दाखल करण्याची धमकी द्यायची, बोलू नये, मोर्चा काढू नये यासाठी पोलिसांवर दबाव निर्माण करायचा हे कार्य माणुसकीला काळिमा फासणारे आहे. तालुक्यामध्ये अवैध धंद्यांच्या माध्यमातून गांजा, दारू, ताडी, जुगार, मटका याबरोबरच दुसऱ्या जिल्ह्यातून नशेली इंजेक्शन आणि मादक पदार्थ पुरविले जात आहे. स्वस्तामध्ये नशा करता येत असल्याने सर्वसामान्य कुटुंबातील युवा पिढी यामध्ये गुरफटली गेलेली आहे. या नशेच्या जोरावर शहरासह तालुक्यातील मुला-मुलींना शारीरिक मानसिक त्रास दिला जातो. बसस्थानक आणि विद्यालय-महाविद्यालय परिसरात वेगाने गाड्या फिरवणे, मुलींची छेड काढणे, मुलांना मारहाण करणे अशा घटना घडत आहेत आणि याची सर्व माहिती पोलिसांना असताना ही पोलीस कोणतीही कारवाई करत नाहीत.
तर काही दिवसांमध्ये शहराचे ग्रामदैवत संत शेख महंमद महाराजांची यात्रा आणि साप्ताह सुरु होत आहे. या यात्रेला आणि सप्त्याला कोणी गालबोट लावणार नाही याची खबरदारी आपल्याला घ्यावी लागेल अशी मागणी गोपाळराव मोटे पाटील यांनी यावेळी केली. यावेळी मोर्च्याचे प्रास्ताविक प्रा. बळे सर यांनी केले. जेष्ठ नेते बाबासाहेब भोस, बापुतात्या गोरे, संतोष इथापे, सुनील वाळके, मंगेश शिंदे, शेखर मखरे, संतोष खेतमाळीस यांची भाषणे झाली.