माळीवाडा वेस पाडण्याचा निर्णय रद्द; खासदार निलेश लंके यांच्या ठाम भूमिकेनंतर आयुक्त डांगे यांना माघार

महानगरपालिका प्रशासनाकडून माळीवाडा वेस पाडण्याचा निर्णय घेण्यात आल्याने नागरिक, व्यापारी, इतिहासप्रेमी आणि सामाजिक संघटनांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता. माळीवाडा वेस ही केवळ एक वास्तू नसून ती अहिल्यानगरच्या इतिहासाची, परंपरेची आणि शहराच्या ओळखीची साक्ष देणारी महत्त्वाची खूण असल्याची भावना नगरकरांनी व्यक्त केली होती.

अहिल्यानगर शहराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अस्मितेशी निगडित असलेल्या माळीवाडा वेस पाडण्याच्या वादग्रस्त निर्णयावर अखेर प्रशासनाला माघार घ्यावी लागली आहे. नगरकरांच्या तीव्र भावना, वाढता लोकांचा रोष आणि खासदार निलेश लंके यांच्या ठाम पाठपुराव्यामुळे हा निर्णय अखेर रद्द करण्यात आला असून, शहरभरातून समाधानाची भावना व्यक्त केली जात आहे.
या निर्णयाविरोधात खासदार निलेश लंके यांनी स्पष्ट आणि ठाम भूमिका घेत माळीवाडा वेस पाडण्याचा निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी प्रशासनाकडे केली. “नगरकरांच्या भावना डावलून, शहराच्या अस्मितेला धक्का देणारा कोणताही निर्णय मान्य केला जाणार नाही,” असे त्यांनी प्रशासनाला ठाम शब्दांत सांगितले. त्यांनी हा निर्णय रद्द न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला होता.
दरम्यान, नागरिकांचा रोष वाढत गेला. व्यापारी संघटना, सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक नागरिकांनी या निर्णयाविरोधात आवाज उठवत प्रशासनावर दबाव वाढवला. सोशल मीडियासह विविध माध्यमांतूनही या निर्णयावर तीव्र टीका करण्यात येत होती.
या सर्व पार्श्वभूमीवर, नगरकरांच्या भावना आणि लोकांचा वाढता रोष लक्षात घेत आयुक्त डांगे यांनी अखेर माळीवाडा वेस पाडण्याचा निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेतला. प्रशासनाच्या या माघारीमुळे नगरकरांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून, हा निर्णय जनतेच्या एकजुटीचा आणि लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याचा विजय मानला जात आहे.
या घटनेमुळे लोकशाहीत जनतेचा आवाज किती प्रभावी ठरू शकतो याचे पुन्हा एकदा प्रत्यंतर आले आहे. माळीवाडा वेस अबाधित राहणार असल्याने शहराच्या ऐतिहासिक वारशाचे संरक्षण झाले असून, नगरकरांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.




