आत्ताची बातमीमहाराष्ट्र
पंतप्रधान मोदी आणि खा. निलेश लंके यांच्या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या; खासदार निलेश लंकेच्या कामाचं पंतप्रधानांकडून कौतुक!
पंतप्रधान मोदी आणि निलेश लंके यांच्या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या; खासदार निलेश लंकेच्या कामाचं पंतप्रधानांकडून कौतुक!

कांदा उत्पादकांचे प्रश्न, रेल्वे–महामार्ग व ग्रामसडक योजनेच्या मागण्याही मांडल्या
अहिल्यानगर : प्रतिनिधी
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर खासदार नीलेश लंके यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसद भवनात भेट घेऊन ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी राबविण्यात येत असलेल्या मोहिमेच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त रायगडावर आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्याचे आमंत्रण दिले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे साक्षीदार असलेल्या रायगडावर होणाऱ्या या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची इच्छा व्यक्त करत, शक्य तितक्या प्रमाणात उपस्थित राहण्याची ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी खा. लंके यांना दिली.या भेटीप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे, खासदार प्रियंका गांधी तसेच महाराष्ट्रातील इतर खासदार उपस्थित होते.
या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच गड-किल्ल्यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी खा. लंके यांनी सुरू केलेल्या मोहिमेचे मनःपूर्वक कौतुक केले. गड-किल्ले हे केवळ दगड-मातीचे अवशेष नसून ते स्वराज्याच्या इतिहासाचे जिवंत प्रतीक असल्याचे सांगत, या मोहिमेमुळे तरुणांमध्ये इतिहासाबद्दल जाणीव आणि अभिमान निर्माण होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. अशीच लोकसहभागातून चालणारी मोहीम सातत्याने सुरू ठेवावी, असा सल्लाही त्यांनी दिला.
पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत २५० पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या अनेक सर्वसाधारण वाड्या-वस्त्या आजही पक्क्या रस्त्यांपासून वंचित असल्याचे निदर्शनास आणून देत, अशा वाड्या-वस्त्यांना तातडीने रस्ते जोडणी करण्याची मागणी खा. लंके यांनी केली. पक्क्या रस्त्यांमुळे शिक्षण, आरोग्य आणि शेतीमालाच्या वाहतुकीला मोठी मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.




