जामखेड येथील निवारा बालगृहात ‘शास्त्रज्ञ आपल्या भेटीला’ उपक्रम उत्साहात साजरा

जामखेड येथील मोहा रोडजवळ असलेल्या निवारा बालगृहात ‘शास्त्रज्ञ आपल्या भेटीला’ हा उपक्रम नाताळ सणाच्या निमित्ताने उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात योगेश्वरी महाविद्यालय, अंबाजोगाई येथील जैवविविधता संशोधक व युवा शास्त्रज्ञ रणजित रावसाहेब राऊत यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत पर्यावरण संरक्षण आणि जैवविविधता संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी रणजित राऊत यांनी विद्यार्थ्यांना परिसरातील विविध पक्षी, प्राणी, वनस्पती आणि स्थानिक जैवविविधतेबाबत माहिती दिली. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाची भूमिका काय असावी, वन्यजीव संरक्षणाची गरज आणि मानवाची जबाबदारी या विषयांवर त्यांनी सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून समर्पक उत्तरे दिली.
या कार्यक्रमास निवारा बालगृहाचे संस्थापक व जामखेड नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक ॲड. अरुण (आबा) जाधव, कृष्णाली फाउंडेशन व कृष्णप्रीत वेलफेअर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटील शेळके, सचिव व पत्रकार प्रियंका पाटील शेळके बोबडे, अमर बोबडे, शिक्षक संतोष चव्हाण, वैजनाथ केसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण व निसर्गाबाबत जागरूकता वाढली असून, भविष्यात निसर्गसंवर्धनासाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित हा उपक्रम ज्ञान, संवेदना आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम ठरला.



