व्याजाच्या पैसेसाठी एका खाजगी सावकाराने एका रिक्षा चालकास उचलून नेऊन मारहाण केली. पहा बातमी सविस्तर.
खाजगी सावकारकी देखील आता डोकं वरती काढू लागली आहे. त्यामुळे अनेक अनुचित प्रकार असे घडतात. संकटकाळी गरजेसाठी गरजू लोक खाजगी सावकाराकडून पैसे घेतात, मात्र खाजगी सावकार हे पैसे वसुली करायच्या वेळी पठाणी वसुली केली जाते आणि त्यामुळे अनेक जणांना अनेक अडचणी येतात यामध्ये मारहाण करणं, खून, मारामाऱ्या या घटना सातत्याने घडत असतात. जामखेड तालुक्यातील या घटनांना पेव फुटत आहे.
जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी खाजगी सावकारी विरुद्ध केलेल्या धडाकेबाज कारवाई नंतर थंड झालेल्या सावकारांनी पुन्हा डोके वर काढले असून आठवड्यातील सावकारीची दुसरी घटना घडली आहे. यावरून जामखेडमध्ये पुन्हा खाजगी सावकारांनी डोके वर काढले असून दि. २५ सप्टेंबर रोजी व्याजाच्या पैशाच्या कारणावरून आणखी एका खासगी सावकाराने आपल्या तीन साथीदारांमार्फत रिक्षा चालक आबेद शेख याला जामखेड बसस्थानक येथून उचलून नेऊन कुसडगाव रोडला असलेले हॉटेल जगदंबा येथे मारहाण केल्याची घटना घडली आहे.
या बाबत सविस्तर माहिती असे की, जामखेड बसस्थानक येथे रिक्षा जवळ उभा असताना आरोपी पप्पू कात्रजकर हा आपल्या तीन साथीदारांना घेऊन तेथे आला व फिर्यादीस म्हणाला की, तु माझ्याकडून दहा हजार रुपये व्याजाने घेतलेले आहेत. त्याचे व्याजाचे दोन लाख रुपये तुझ्याकडे राहिले आहेत. ते मला आत्ताचे आत्ता पाहिजेत. यावेळी फिर्यादी आबेद शेख हा आरोपीला म्हणाला तुला दहा हजार रुपये व त्याचे व्याज आज पर्यंत ठरलेल्या हप्ता प्रमाणे दिले आहे व त्यास मुद्दलाचे व व्याजासह असे एकुण तुला ३६००० रुपये दिले आहेत. माझ्याकडे तुझे पैशाची कसलीही बाकी नाही असे म्हणाले.
तेंव्हा आरोपी पपु कात्रजकर मला म्हणाला तुझ्याकडे कशी काय पैसे बाकी नाही व त्याला राग आल्याने आरोपी पप्पू कात्रजकर व त्याच्या सोबत आलेले तीन अनोळखी इसमानी त्यांचे पांढऱ्या रंगाच्या पोकलेन व जेसीबी डिझेल वाहतुक बोलेरो गाडीमध्ये बळजबरीने बसून फिर्यादीस मारहाण केली व कुसडगाव येथील जगदंबा हॉटेल येथे घेऊन गेले व तेथे आरोपी पप्पू कात्रजकर व तीन अनोळखी इसमांनी आबेद शेख यास घाण घाण शिवीगाळ, दमदाटी करून बेल्टने व लाथा बुक्क्याने मारहाण केली. यात शेख हे किरकोळ जखमी झाले.