मोठी बातमी : अहमदनगर शहरातील काही भागात जाणवले भूकंप सदृश धक्के; लोकांमध्ये भीतीचे वातावरण.
अहमदनगर मधून एक मोठी बातमी समोर येत आहे. अहमदनगर शहरानजीक केडगाव इंडस्ट्रियल एरिया तसेच नगर कल्याण रोड सावेडीतील काही भागात भूकंप सदृश सौम्य धक्के जाणवले आहेत. काही दिवसांपूर्वी राहुरी फॅक्टरी भागामध्ये असेच भूकंपाचे धक्के जाणवले होते आणि आज १४ नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठ ते साडेनऊ च्या दरम्यान अहमदनगर च्या उपनगरी भागात भूकंप सदृश धक्के जाणवले आहेत.
खिडक्यांची तावदाने थरथरल्याने नागरिक भयभीत होऊन घरातून बाहेर पडून रस्त्यावर आले. अनेकांना एका मिनिटात चार ते पाच वेळा असे धक्के जाणवल्याचे काही नागरिकांनी सांगितले.
” अचानक दारे – खिडक्या हालू लागले आम्हाला भीती वाटली आणि म्हणून आम्ही सहकुटुंब घराच्या बाहेर येऊन थांबलो आहोत.” अशा प्रतिक्रिया आनंद पार्क येथील रहिवासी असणाऱ्या गीता कळमकर यांनी दिली आहे.
” अचानक खिडक्या आणि पडदे हालू लागले काय घडत हे लक्षात आलं नाही मात्र हे सौम्य भूकंपाचे धक्के असू शकतात असं मला वाटत आहे.” असा अंदाज केडगाव परिसरातील राहणारे अमोल शिंदे यांनी व्यक्त केला.
धर्माधिकारी मळ्यात राहणारे मकरंद खेर हे म्हणाले कि, ” रात्री ९.३० ते ९.३५ च्या सुमारास मला दोनदा धक्के जाणवले, जवळपास १ – १.३० सेकंद खिडक्याचे तावदाने वाजली तेव्हा वाटले कि मांजर वगैरे असेल मात्र दुसऱ्यांदा देखील तसेच झाले. तेव्हा मनात भीती निर्माण झाली आणि हे भूकंपाचे सौम्य धक्के आहेत कि काय असे वाटू लागले.”
भूगर्भ शास्त्रज्ञांनी यामध्ये लक्ष घालून नेमके हे धक्के कशाचे याचा अभ्यास करावा तसेच नागरिकांमध्ये असणाऱ्या संभ्रमाचे निराकरण करावे. यंदा मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला असून पावसाचे पाणी जमिनीत मोठ्या प्रमाणावर मुरलेले आहे तसेच धरण क्षेत्रातही पाण्याचा मोठा दाब आहे याचा या घटनेशी काही संबंध आहे का अशीही चर्चा नागरिकांमध्ये होताना दिसत आहे