गुणवत्तेची लेणी दत्तवाडी गावात राबवला जातोय रात्रीचा अभ्यासिका वर्ग.
विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी
जगप्रसिद्ध अजिंठालेणीच्या डोंगर रांगेत हिरवाईने नटलेली छोटीशी दत्तवाडी वस्ती अवघड व दुर्गम डोंगर परिसरात अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही शैक्षणिक गुणवत्तेचे संवर्धनासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दत्तवाडी चे मुख्याध्यापक बापू बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली अनेक नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी करून शाळा व गावाचे कार्य इतरांसाठी नेहमी प्रेरणादायी ठरले आहे.
सध्या दत्तवाडी गावात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था औरंगाबादचे अधिव्याख्याता नारायण पडूळ यांच्या प्रेरणेतून गावात रात्री 7 ते 9 या वेळेत गावातील वर्ग पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ग्रामस्थांच्या पुढाकाराने व जिल्हा परिषद दत्तवाडी शाळेच्या मार्गदर्शनाने शैक्षणिक गुणवत्तेचा आलेख उंचावण्या सोबत वाचनाची आवड तसेच विविध शिष्यवृत्ती परीक्षांची तयारी व सराव सोबत भविष्यातील संधी ओळखून आतापासूनच मुलांमध्ये विविध स्पर्धा परीक्षांची तयारी सोबत गावातून शासकीय अधिकारी निर्माण करण्याविषयी ची दूरदृष्टी ठेवून ग्रामस्थांनी गावात अभ्यासिका वर्गाची सुरुवात केली आहे.
सदर उपक्रमासाठी प्रविण मसालेवाले पुणे यांच्याकडून शाळेसाठी विविध स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी व वाचनाची गोडी निर्माण करणारे 25 हजार रुपयांची पुस्तके शाळेला भेट दिली आहेत. सदर अभ्यासिका वर्गाची पूर्ण जबाबदारी गावासोबत शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य, माता-पालक संघातील अध्यक्ष सदस्य, शिक्षक-पालक संघातील अध्यक्ष सदस्य, सोबत गावातील शिक्षित तरुणांनी पुढाकार घेत दररोज रात्रीच्या वेळेस 7 ते 9 या वेळेत मुलांकडून नियमित अभ्यासाचा सराव करून घेत आहेत. सदर अभ्यासिका वर्गासाठी गावातून 9 सदस्यांचा गट स्थापन केला आहे.अभ्यासिका वर्गातून शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्तेत वाढ घडवून आणणे.मुलांमध्ये चांगल्या साहित्य वाचनाची गोडी निर्माण करणे. मुलांमध्ये स्वयंअध्ययनाची सवय रुजवणे.आणि विविध शिष्यवृत्ती परीक्षेतील मुलांची संख्या वाढवणे. सोबत गावातून मोठ्या पदावर शासकीय सेवेत अधिकारी निर्माण करणे हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून मुख्याध्यापक बापू बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली गावात शैक्षणिक वातावरण निर्माण करून घेण्यासाठी सर्व गाव एकवटले आहे.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था औरंगाबादचे नारायण पडूळ यांच्या नेतृत्वाखाली काही दिवसापूर्वी गावात रात्री 8 वाजेला पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात गट साधन केंद्र सोयगाव चे परमेश्वर कठोरे, तसेच सुनील बावचे विषय तज्ञ् सोबत शाळेचे मुख्याध्यापक बापू बाविस्कर व शिक्षक गणेश बाविस्कर सोबत ग्रामसेवक गणेश गवळी यांच्यासमवेत सदर उपक्रमा विषयी ग्रामस्थांमध्ये जनजागृती करुन भविष्यवेध या शीर्षकाखाली पुढील काही वर्षात गावात सकारात्मक बदल कसा घडवून आणता येऊ शकतो.याविषयी मार्गदर्शन केले. शिक्षकांच्या व अधिकाऱ्यांच्या बदल्या होत राहतात परंतु गाव मात्र आहे त्याच ठिकाणी राहते. म्हणून सदर उपक्रम गावाचा आहे आणि गावातीलच मुलांसाठी ग्रामस्थांनीच राबवावा याविषयी ग्रामस्थांना नारायण पडूळ यांनी सूचना दिल्या.संबंधित उपक्रमाची पूर्ण कल्पना गावाला दिल्यानंतर ग्रामस्थांनी सर्वानुमते सदर उपक्रमाची अंबलबजावणी विषयी संमती दर्शवली.
ग्रामस्थांच्या पुढाकाराने सदर उपक्रम दिनांक 27 /09 /2022 पासून दत्तवाडी गावात रात्रीच्या वेळेस 7 ते 9 या वेळेस वर्ग 1ली ते 12वी पर्यंत शिक्षण घेणारे व गावातच राहणाऱ्या सर्व विध्यार्थ्यांसाठी नियमित सुरू करण्यात आला आहे. अभ्यासिका वर्गासाठी गावातील पहिली ते बारावी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या 32 विद्यार्थ्यांसाठी सध्या हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमातून शाळेतील क्रमिक पाठ्यपुस्तके सोबत वाचनाची गोडी निर्माण होण्यासाठी कथा कादंबऱ्या प्रवासवर्णने सोबत इतर साहित्यिकांची पुस्तके मुलाना वाचनासाठी उपलब्ध करून दिली जात आहेत. तसेच बारावीनंतर विविध स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी करता यावी व त्याची पायाभरणी शाळेतून व्हावी हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून विविध प्रकाशनाची व स्पर्धा परीक्षेसाठी उपयोगी व मार्गदर्शन असणारी विविध पुस्तके सुद्धा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जात आहे.
मोठ्या वर्गातील मुले आपल्या अभ्यासा सोबत लहान वर्गातील मुलांनाही शिकवण्याचे कार्य करून स्वतःचाही अभ्यास करून घेत आहे. गावातील शिक्षित तरुण तसेच पालक वर्ग मुलांच्या अभ्यासावर लक्ष व मुलांना शिक्षण देण्याचे कार्य करीत आहेत. त्यामुळे निश्चितच गावात चांगले शैक्षणिक वातावरणाची पायाभरणी ग्रामस्थांनी करून घेतली आहे. सोबत शाळेतील मुख्याध्यापक बापू बाविस्कर व सहशिक्षक गणेश बाविस्कर हे गावात रात्रीच्या वेळेस थांबून अभ्यासिका वर्गाचे अंमलबजावणी गावाकडून करून घेत आहेत. त्यामुळे भविष्यात कोणत्याही शिक्षक व अधिकाऱ्यांच्या बदल्या जरी झाल्या तरी मुलांचे शैक्षणिक गुणवत्तेवर कोणताही परिणाम होणार नाही. याची गावातील व्यक्तींना खात्री पटत आहे. व पुढील काही वर्षात निश्चितच गावातून एखादा प्रशासकीय अधिकारी निर्माण होईल अशी आशा डोंगराळ व दुर्गम भागातील दत्तवाडी वस्तीतील ग्रामस्थ उराशी बाळगत आहेत.
*दुर्गम भागात असलेल्या दत्तवाडी गावातील अभ्यासिकामुळे गावातील सर्व मुलांना अवांतर वाचन करण्याची सवय लागेल सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेत विद्यार्थी सहभागी होऊन यशस्वी होतील खात्री वाटते दत्तवाडी येथील ग्रामस्थ शिक्षक व विद्यार्थी यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा.
नारायण बाबासाहेब पडूळ
अधिव्याख्याता
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, औरंगाबाद
बापु सुकदेव बाविस्कर मुख्याध्यापक जि प प्रा शाळा दत्तवाडी तालुका सोयगांव जिल्हा औरंगाबाद जिद्द आणि चिकाटी असेल तर प्रत्येक समस्येवर उपाय शोधता येतो. गावातून मोठा प्रशासकीय अधिकारी निर्माण होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तशी संधी विद्यार्थ्यांना गावातच उपलब्ध करून देण्यासाठी उचललेले पाऊल निश्चितच ग्रामस्थांना यशाकडे घेऊन जाणार आहे
*ग्रामस्थ:शांताराम वनाजी भोरकडे *
या उपक्रमामुळे आम्हाला गावातील सर्व मुलांचा एकाच वेळी एकाच ठिकाणी अभ्यास करून घेता येऊन मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेत प्रगती घडवून आणणे शक्य होणार आहे.