खा. निलेश लंके यांचे स्थानिक गुन्हे शाखेविरोधात सोमवारपासून उपोषण; शाखेतील हप्तेखोरीची तक्रार करूनही दखल नाही
नगर : प्रतिनिधी,
पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराविरोधात दि. ११ जुलै रोजी मुख्यमंत्रयांसह इतरांकडे तक्रार करूनही त्याची दखल न घेतली गेल्याने खा. नीलेश लंके हे त्यांच्या सहका-यांसह सोमवार दि.२२ जुलै पासून पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत.
खा. लंके यांनी यासंदर्भात गुरूवारी पोलीस अधिक्षकांना पत्र पाठविले आहे. या उपोषणासाठी लाउड स्पिकर तसेच मंडप लावण्यासंदर्भात परवानगी मागण्यात आली आहे. निवेदनात नमुद करण्यात आहे की, स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराबाबत दि.११ जुलै रोजी पत्रद्वारे अवगत करण्यात आले होते. परंतू त्याची अद्यापपर्यंत कुठलीही दखल घेतली गेली नाही, किंवा संबंधितांवर कोणतीही कठोर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे आपण व आपले सहकारी पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
या तक्रारीसंदर्भात खा. लंके यांनी ११ जुलै रोजी मुख्यमंत्रयांना पत्र पाठवून नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधले होते. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, उपनिरीक्षक सोपान गोरे व इरत कर्मचारी हे राजरोसपणे हप्ते घेत आहेत. हप्ते गोळा करण्याकामी रविंद्र आबासाहेब कर्डीले व त्यांचे सहकारी त्यांना मदत करत आहेत. रविंद्र कर्डीले यांची शिर्डी येथील साई मंदीर सुरक्षा विभागात नेमणूक असतानाही तात्पुरत्या स्वरूपात त्यांची सायबर सेल नगर येथे बदली करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेल या दोन्ही अस्थापना वेगवेगळया असून दोन्ही विभाग स्वतंत्र असताना या शाखांचा कार्यभार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्याकडे देण्यात आला आहे. आहेर यांच्याकडे दोन्ही शाचखेचा कार्यभार हा फक्त आर्थिक लोभापाई असल्याचा आरोप खा. लंके यांनी पत्रात केला आहे.
जिल्हयामध्ये बीफ मटन, ऑनलाईन क्लब, वाळू, गुटखा, दारू, गांजा, चंदनतस्करी हे व्यवसाय तसेच मटका, बिंगो हे व्यवसाय पोलीसांच्या आशिर्वाद आणि आश्रयाखाली सुरू मोठया प्रमाणावर सुरू आहे. या प्रकरणाचा मास्टर माईंड रविंद्र कर्डीले असून त्यांच्यावर यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेत असताना लाचलुचपत अन्वेशन शाखेने कारवाई केलेली आहे. हा खटला जिल्हा न्यायालयात प्रलंबित आहे. नगर शहरातील एका गुन्हयामध्ये राज्य गुन्हे अन्वेशन शाखेमार्फत सुरू असल्याचेही या पत्राद्वारे निदर्शनास आणून देण्यात आले आहे.