सणासुदीच्या काळात भेसळ रोखण्यासाठी कडक पावले उचला ! सत्यजीत तांबे यांची अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांकडे मागणी.
मुंबई, प्रतिनिधी
गणेशोत्सव संपल्यानंतर नवरात्रीला सुरूवात झाली. नवरात्रीनंतर आता राज्यातील जनतेला दिवाळीचे वेध लागले आहेत. सणासुदीच्या या काळात मिठाईचा खप वाढतो. याचा फायदा उचलत भेसळखोर दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळीला सुरुवात करतात. काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी यासंदर्भात राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांना पत्र लिहिले आहे. राज्यातील भेसळीचे प्रकार रोखण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत अशी मागणी तांबे यांनी केली आहे.
काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांना पत्रात म्हटले आहे की, “मिठाई, दुग्धजन्य पदार्थांच्या वाढत्या मागणीमुळे दुकानदार हे भेसळ करण्याची दाट शक्यता असते. अन्न पदार्थांमधील भेसळ ही अत्यंत गंभीर आणि चिंतेचा विषय बनला आहे. सणासुदीच्या काळात भेसळ रोखण्यासाठी भेसळविरोधी पथकाची स्थापना केली जाऊ शकते. जेणेकरून ग्राहकांना चांगल्या दर्जाचे आणि भेसळविरहीत अन्नपदार्थ मिळू शकतील.” तांबे यांनी लिहिलेल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, दसरा आणि दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आपल्या देशात या सणांसोबत मिठाई आणि अन्य खाद्यपदार्थांचे नाते जोडले गेले आहे; किंबहुना हे अन्नपदार्थ आपल्या संस्कृतीचा एक भागच बनले आहेत.
भेसळीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी आरोग्य विभागाने दुकाने आणि दुग्धजन्य पदार्थ तसेच मिठाई बनवणाऱ्या कारखान्यांवर धाडी टाकल्या पाहिजेत. जर कोणी भेसळ करताना दोषी आढळला तर त्याच्याकडून सक्तीने दंड वसूल केला जावा आणि त्याचा परवाना रद्द केला जावा. सरकारने कारवाई व्यतिरिक्त सर्वसामान्य ग्राहकांमध्ये भेसळीविरोधात जनजागृती निर्माण करण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत, असे तांबे यांनी पत्रात म्हटले आहे.