“समूह छोटा पण संदेश मोठा” पाथर्डी येथे सामाजिक साहित्य संमेलन उत्साहात संपन्न….
पाथर्डी प्रतिनिधी वजीर शेख
शनिवार दिनांक 22/04/2023 रोजी क्रांतीसुर्य जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांचा 892 जयंती सोहळा पाथर्डी शहरात मोठ्या उत्साहात पार पडला.
विरशैव लिंगायत समाज बांधव एकत्र येत ‘सामाजिक साहित्य संमेलन’ कार्यक्रम आयोजित करून एक समाजाला दिशा देणारा नाविन्यपूर्ण उपक्रम या जयंती सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आला.
महापुरुषांची जयंती साजरी करण्यापाठीमागे त्यांचे विचार समाजाने अंगीकृत करावेत हा उद्देश असतो. परंतु अनेकदा जयंती मोठ्या उत्साहात थाटामाटात साजरी केली जाते परंतु त्या महापुरुषांच्या विचारांची पेरणी समाजात होताना दिसत नाही. परंतु पाथर्डी शहरात क्रांतीसुर्य जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांचा जयंती सोहळा हा एक आगळावेगळा सोहळा ठरला. महात्मा बसवेश्वर यांचे विचार समाजामध्ये रुजवण्यासाठी विरशैव लिंगायत समाजाने उचललेले हे पाऊल निश्चितच समाजाला एक उभारी देणारे ठरले आहे. या कार्यक्रम प्रसंगी समाज बांधवांची असलेली शिस्तप्रियता, महिलांचा शंभर टक्के असलेला सक्रिय सहभाग, विचारावर आणि आचारावर असलेली पकड, शांतता, संयम आणि त्यांना प्रेरणा देण्याचे सामर्थ्य या कार्यक्रमातून शिकायला मिळाले.
क्रिएटिव्ह फाउंडेशन शेवगाव यांच्या सहकार्याने हा दिमागदार सोहळा पार पडला. संमेलनाध्यक्ष डॉ. कैलास दौंड यांनी समाजाने लेखणीतून व्यक्त व्हावे असे आव्हान व्यासपीठावरून केले. त्याचप्रमाणे अविनाश मंत्री यांनी समाज प्रबोधन करत एकजुटीची शिकवण दिली. पत्रकार माननीय राजेंद्र देवढे यांनी क्रांतीसुर्य जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या चरित्राबद्दल सखोल असे मार्गदर्शन उपस्थित मान्यवरांना केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वागताध्यक्ष कवी राजेंद्र उदारे यांनी प्रचंड मेहनत घेतली. या अभिवादन सोहळ्यासाठी पूज्य माधव बाबा ( मठाधिपती शंकर महाराज मठ ), मा. अविनाश मंत्री ( तालुकाध्यक्ष म. सा.प. ), मा. राजेंद्र देवढे (पत्रकार ), निलेश दौंड (अध्यक्ष क्रियेटीव्ह फाउंडेशन शेवगाव) हे मान्यवर उपस्थित होते.
या साहित्य संमेलनामध्ये सामाजिक प्रबोधनावर आधारित काव्यरचना सादर करण्यात आल्या. सर्वप्रथम शाहीर भारत गाडेकर यांच्या उंच आवाजात वंदनगीत सादर करून साहित्य संमेलनाला सुरुवात झाली. शायर हुमायून आतार यांनी त्यांच्या शायरीतून उपस्थित सर्व मान्यवरांची मने जिंकली. महेश लाडणे, बाळासाहेब चिंतामणी, बद्रीशेठ पलोड, लक्ष्मण झिंजुर्के, विष्णुपंत वाघमारे, आत्माराम शेवाळे, बंडू निळे, श्रीमती सविता ढाकणे, श्रीमती पुनम राऊत, जयराम देवढे या मान्यवर कवी कवयित्रींनी आपल्या काव्यरचना सादर केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेष्ठ कवी बाळासाहेब कोठुळे यांनी केले. कार्यक्रम समाप्तीनंतर पप्पूसेठ सुपेकर यांच्यातर्फे महाप्रसाद देण्यात आला.
- निलेश दिलीपराव दौंड