आ. लंके यांना होनोरीस कॉसा डॉक्टरेट प्रदान कोरोना रेस्क्यू ऑपरेशनमधील योगदानाची दखल..
फ्रान्सच्या थेम्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या वतीने गोव्यात पदवी प्रदान
कोरोना रेस्क्यू ऑपरेशनमधील आ. नीलेश लंके यांनी दिलेल्या योगादनाची दखल घेत फ्रान्सच्या थेम्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या वतीने त्यांना होरोनरीस कॉसा डॉक्टरेट या मानद पदवीने शनिवारी गोव्यातील पणजी येथे डॉ. रिपु राजन सिन्हा, डॉ. अरुण ओमिनी, डॉ. प्रियदर्शनी नायक, डॉ. संग्रामसिंह रामराव माळी यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.
मार्च २०२० मध्ये कोरोना महामारीने जगभर थैमान घातल्यानंतर आ. नीलेश लंके यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोना बाधितांवरील उपचारासाठी स्वतःला झोकून दिले. सरकारकडून लॉकडाऊन जाहिर करण्यात आल्यानंतर हातावर पोट असलेल्या नागरिकांसाठी त्यांनी अन्नछत्र सुरू करून त्यांची उपासमार होऊ दिली नाही. लॉकडाऊनमुळे परराज्यांमधील नागरीक त्यांच्या घरी परतत असताना त्यांच्या भोजनाची, निवासाची व्यवस्था करण्यासाठी आ. लंके यांनी पुढाकार घेतला. नगर-पुणे, नगर-कल्याण महामार्गावरून परराज्यात अनवानी जाणाऱ्या वाटसरूंना चपलांचीही त्यांनी व्यवस्था केली.
कोरोना रूग्णसंख्या वाढू लागल्यानंतर लंके यांच्या संकल्पनेतून कर्जुलेहर्या येथे शरदचंद्र पवार आरोग्य मंदिराच्या माध्यमातून त्यांनी हजारो रूग्णांसाठी मोफत उपचार उपलब्ध करून दिले. आ. लंके यांच्या या योगदानाची दखल घेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पारनेर- नगर मतदासंघांसाठी रूग्णवाहिका भेट दिली. राज्य, देशभरातील अनेकांकडून लंके यांच्या या रूग्णसेवेचे कौतुक झाले.
कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर वाढत्या रूग्णसंख्येमुळे प्रशासनही हतबल झाले होते. आ. लंके यांनी मात्र न डगमगता हे आव्हान स्विकारत भाळवणी येथे १ हजार १०० बेडचे शरदचंद्र पवार आरोग्य मंदिराची अवघ्या दोन दिवसांत उभारणी केली. पारनेर तालुक्यासह नगर जिल्हा व जिल्हयाबाहेरील रूग्णांनाही त्याचा फायदा झाला. तीस हजारांहून अधिक रूग्ण या आरोग्य केंंद्रातून बरे होऊन घरी गेले. जवळचे नातलग रूग्णाजवळ थांबण्यास धजावत नसताना आ. लंके यांनी दररोज प्रत्येक रूग्णाची भेट घेत त्याच्या शरीरातील ऑक्सीजनची पातळी तपासून त्यांचा धीर देण्याचे काम केले. आ. लंके यांच्या या धाडसाचे अनेकांना आश्चर्य वाटले. तीस हजारांहून अधिक रूग्ण खडखडीत बरे होऊन घरी परतत असताना या आरोग्य मंदिरात एकाही रूग्णाचा मृत्यू झाला नाही हे विशेष ! आ. लंके यांच्या या योगदानाची देश विदेशात दखल घेतली जाऊन त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले.
गोव्यातील पणजी येथे पार पडलेल्या या पदवी प्रदान कार्यक्रमाप्रसंगी प्रा. संजय लाकूडझोडे, सुदाम पवार, अॅड. राहुल झावरे, भाऊसाहेब भोगाडे, अनिल गंधाक्ते, कांतीलाल भोसले, अभय नांगरे, दादा दळवी, सुरेश फापाळे, नाथाजी बोरकर, शुभम दाभाडे आदी उपस्थित होते.