संत रविदास महाराज जयंतीनिमित्त मोफत वृत्तपत्र वाचनालय व गटई स्टॉलचे उद्घाटन; चर्मकार वि. संघाचा उपक्रम.
संत, महात्मांची जयंती दर्शन घेण्यासाठी नव्हे, तर त्यांच्या विचारांचे पाईक होण्यासाठी -आ. संग्राम जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघ, लोकनेते मा.आ. सितारामजी घनदाट (मामा) सामाजिक प्रतिष्ठान व रविदास चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्री यांच्या संयुक्त विद्यमाने संत गुरु रविदास महाराज यांच्या 646 वी जयंती धार्मिक व सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात आली. चर्मकार विकास संघाच्या नगर-मनमाड रोड, सावेडी येथील मुख्य कार्यालयात झालेल्या जयंती उत्सव सोहळ्यात आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सावित्रीबाई महात्मा ज्योतिबा फुले मोफत वृत्तपत्र वाचनालय व गटई स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले.
प्रारंभी संत गुरु रविदास महाराज यांची आरती करुन महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. यावेळी चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, सुभाष चिंधे, सर्जेराव गायकवाड, नगरसेवक सुनिल त्र्यंबके, डॉ. सागर बोरुडे, निलेश बांगरे, कवी सुभाष सोनवणे, तायगा शिंदे, आदिनाथ बाचकर, रुक्मिणी नन्नवरे, रामदास सातपुते, प्रमोद भारुळे, रामदास उदमले, श्रीपती ठोसर, रामराव ज्योतिक, संपत नन्नवरे, गिरीश केदारे, विलास जतकर, अरविंद कांबळे, भाऊसाहेब आंबेडकर, दादासाहेब क्षीरसागर, राजेंद्र धस, सुखदेव आंबेडकर, रावसाहेब कानडे, अरुण गाडेकर आदींसह चर्मकार समाज बांधव व महिला उपस्थित होत्या.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, संतांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी समाजाने एकत्र येण्याची गरज आहे. संत, महात्मा व महापुरुषांची जयंती दर्शन घेण्यासाठी नव्हे, तर त्यांच्या विचारांचे पाईक होण्यासाठी आहे. त्यांच्या विचारांमध्ये मानवजातीचे कल्याण आहे. हा विचार घेऊन चर्मकार विकास संघ सातत्याने समाजोपयोगी कार्य करत आहे. दुर्बल घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम केले जात आहे. समाजातील युवकांना उद्योग क्षेत्रात चालना देण्यासाठी रविदास चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीची केंद्राची मान्यता घेऊन स्थापना करण्यात आली आहे. समाजाला फाटे फुटल्यास पुढील पिढीचे नुकसान होते, यासाठी समाजाला एकसंघ ठेवण्याचे काम चर्मकार विकास संघ करत असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ साहित्यिक सुभाष सोनवणे म्हणाले की, संतांचे विचार जीवनाला दिशा देतात. संत रविदास महाराजांना गुरुस्थानी मानून त्यांची पहिली जयंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी साजरी केली. ज्ञान व विचारांचे बाळकडू भावी पिढीला देण्यासाठी संतांचे विचार वाचा म्हणजे भावी पिढी वाचेल. घरात संविधान ठेवा, कायदा अभ्यासा तुमची लूट होणार नाही. ज्ञान नसल्याने लूट सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. महिला आघाडी प्रमुख रुक्मिणी नन्नवरे यांनी समाजात समतेचे मूल्य रोहिदास महाराजांनी रुजवले असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रदेशाध्यक्ष संजय खामकर म्हणाले की, देशात संत रविदास महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. समाजाला दिशा देण्याच्या उद्देशाने जयंती दिनी सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. समाज विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. आमदार संग्राम जगताप समाजातील एक घटक असून, समाजाला बरोबर घेऊन जाण्याचे काम ते करत आहे. या संघटनेचे संपूर्ण महाराष्ट्रात 1 लाख सदस्य असून, 12 हजार पदाधिकारी महाराष्ट्रात कार्यरत आहे. नगरसेवक सुनील त्र्यंबके यांनी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थितांच्या हस्ते चर्मकार विकास संघाच्या दिनदर्शिकाचे प्रकाशन करण्यात आले. पाहुण्यांचे स्वागत पुस्तके देऊन सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष अशोक कानडे यांनी मानले. आभार —-यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बलराज गायकवाड, निलेश आंबेडकर, गणेश नन्नवरे, किरण सोनवणे, अर्जुन कांबळे, संतोष कदम, संतोष कांबळे, गणेश लव्हणे, विनोद कांबळे, आकाश गायकवाड, गितेश देवरे, दिलीप कांबळे, संदीप सोनवणे, संजय सातपुते, अमोल डोळस, संदीप डोळस, लक्ष्मीताई दुर्गे, शोभा वेताळ, मोहिनी आंबेडकर यांनी परिश्रम घेतले.