रस्त्याने पाडले प्रशासनाला तोंडघशी; माळेगाव-पिंप्री रस्त्यावर अवैध गौणखनिज वाहतूक करणारे डंपरच फसले.
विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी
सोयगाव, दि.१३..सोयगाव कडून माळेगाव-पिंप्री या एकेरी मार्गाने जाणारे मुरूम वाहतूक करणारे डंपर रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे माळेगाव-पिंप्री या रस्त्यावर चालकाचा तोल जाऊन रस्त्यात फसल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली.
मात्र या रस्त्याच्या बाजूलाच शेती पंपाचे रोहित्र थोडक्यात बचावले त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे या घटनेत रस्त्याच्या दुरावस्थेने मात्र महसूल प्रशासनाला तोंडघशी पाडले असून एकीकडे शासनाचा कोट्यवधी रु चा महसूल बुडवून सोयगाव तालुक्यातून अवैध गौण खनिज चोरट्या मार्गाने वाहतूक सर्रासपणे सुरू असल्याच्या तक्रारी वाढत्या झाल्या होत्या.
असे असताना दुसरीकडे मात्र सोयगाव तालुक्यातून अवैध गौण खनिजाची वाहतूक सुरू नसल्याचे महसूल विभागाच्या म्हणणे आहे त्यामुळे रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे फसलेले हे गौण खनिज वाहतूक करणारे डंपर अवैध होते की वैध होते.
याबाबत ग्रामस्थांना संभ्रम निर्माण झाला असून प्रशासनाने मात्र हे डंपर शासकीय कामावर सुरू असल्याचे अंदाज वर्तविला असून तरीही शासकीय काम करणाऱ्या ठेकेदारांच्या कामांच्या निविदेतून या डंपरचा गौण खनिज वाहतुकीचा परवाना होता का? असाही प्रश्न निर्माण झालेला आहे .